मुलाखतीची पूर्वतयारी करताना

मुलाखतीच्या दरम्यान उमेदवारांचे व्यक्तिमत्त्व, शैक्षणिक पात्रता, विषयाचे ज्ञान, सामान्यज्ञान, चालू घडामोडी, नाट्य, कला, एनसीसी, वाक्‌चातुर्य, कर्तृत्व शक्ती, बलस्थाने व कमकुवतपणा, व्यावसायिक अनुभव, क्षमता, कल्पकता, सृजनशीलता, कौशल्य, वक्तृत्व, सभाधीटपणा, उत्तम देहबोली, आत्मविश्‍वास तसेच आज्ञाधारकपणा इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केला जातो, हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे. 

बहुसंख्य उमेदवार Bank Clerk/ Bank P.O/ MPSC/ UPSC/ SSC/ Police परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यावर प्रत्यक्ष मुलाखतीच्या (Interview) पूर्वतयारीला लागतात. उमेदवारांना लेखी परीक्षेपेक्षा या मुलाखतीचेच टेंशन जास्त येते. मुलाखती दरम्यान अत्यंत सोपे प्रश्‍नदेखील टेंशनमुळे - ताणतणावामुळे कठीण वाटू लागतात. काही वेळा प्रश्‍न कळाला तरी ठराविक व अचूक शब्दात उत्तर देता येत नाही. यामुळे कमालीचे औदासीन्य येते व मुलाखत कोसळते. तेव्हा उमेदवारांनी मुलाखती दरम्यान, तणावमुक्त व शांतपणे राहून, आत्मविश्‍वासाने मुलाखतीला सामोरे जाणे आवश्‍यक असते.

कर्मचारी व कामगार हा उत्पादनाचा एक महत्त्वाचा घटक असल्याने योग्य, लायक व पात्र उमेदवारांची नियुक्ती करणे उद्योगाच्या हिताचे असते. कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे हे कार्मिक (Personnel) विभागाचे महत्त्वाचे कार्य आहे. कार्यासाठी योग्य कर्मचाऱ्यांची शोधाशोध करून विशिष्ट कार्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे हा भरतीचा प्रमुख उद्देश असतो.

मनुष्यबळ नियोजन व विकासाचे कार्य अत्यंत व्यापक स्वरूपाचे आहे. त्यामुळे पर्सोनेल मॅनेजर, एचआरडी एक्‍झीक्‍युटीव्हजचे कामदेखील काळाप्रमाणे व्यापक व गुंतागुंतीचे बनले आहे. मनुष्यबळ नियोजनात कर्मचाऱ्यांविषयीची कार्ये, त्यांच्या जबाबदाऱ्या व त्यांचे अधिकार इत्यादींचा समावेश होतो. याबरोबरच पुढील गोष्टींचा मनुष्यबळ नियोजनात (Manpower Planning) समावेश होतो.

1) कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांची भरती करणे.
2) भरतीसाठी विविध पद्धतीचा अवलंब करणे.
3) कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे.
4) कार्य विश्‍लेषण व कार्य मूल्यांकन करणे.
5) कर्मचाऱ्यांचा पगार, वेतनवृद्धी व मोबदला ठरविणे.
6) कामगार व मालकातील संबंध जोपासणे.
7) कामगारांची सुरक्षा व कामगार कल्याण योजना राबविणे इ.
कामगारांची व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यापूर्वी साधारणतः पुढील प्रक्रिया राबविली जाते.

1) लेखी परीक्षा (Writtern Test) किंवा स्वाभाविक कल परीक्षा (Aptitude Test)
2) वैयक्तिक मुलाखत (Personal Interview)
3) कागदपत्राची तपासणी करणे. (Verificartion of Documents)
4) संदर्भाची तपासणी करणे (Reference Check)
5) शारीरिक व वैद्यकीय चाचणी (Medical Test)
6) अंतिम निवड व नेमणूक पत्र (Final Selection & Appoinment Letter)
कर्मचाऱ्यांची भरती करण्यापूर्वी त्यांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात येते. उद्योगधंद्यांच्या वर्तमान, भविष्यकाळातील गरजा लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येते. भरतीसाठी कर्मचाऱ्यांची विविध प्रकारे मुलाखती घेण्यात येतात. उदा.,

1) प्रत्यक्ष मुलाखत (Direct Interview)
2) समूह मुलाखत (Group Discussion)
3) मुलाखत मंडळाद्वारे मुलाखत (Border Interview)
4) तत्काळ मुलाखत (Walk- in - Interview)
5) कॅम्पस इंटरव्ह्यू

वरीलप्रमाणेच मुलाखतीचे अन्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

1) व्यवसायासाठी मुलाखत (Business Interview)
2) माध्यमांसाठी मुलाखत (Medical Interview)
3) नवीन वस्तूंच्या विक्रीसाठी मुलाखत (Product Marketing)
4) फॅशन शो 
5) निवडणूक उमेदवार मुलाखती 
6) स्पर्धा परीक्षांसाठी मुलाखती (Competitive exams) इ.

आजच्या आधुनिक काळात मुलाखतीचे स्वरूप व महत्त्व बदलत आहे. व्यवसायाची भरभराट करण्यासाठी व संस्थेचा नावलौकिक (Goodwill OR Peputation) वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येक कंपनी किंवा संस्था हुशार, सर्वोत्तम, बुद्धिमान, हजरजबाबी, छाप पाडणारी माणसं शोधत असतात. उदा., एखाद्या कॉलेजसाठी प्राचार्य पदाची निवड करताना उच्चशिक्षित, अनुभवी, शासनाच्या अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्तीची नेमणूक केली जाते. परंतु तरीही त्याचबरोबर आज-काल इतरही गोष्टी अजमावल्या जातात. उदा. अभ्यासेतर उपक्रमांची आवड, सांस्कृतिक व क्रीडाविषयक पार्श्‍वभूमी, चांगले प्रभावी व्यक्तिमत्त्व (Dynamic Personality), वगैरे गोष्टी लक्षात घेतात.

थोडक्‍यात आज-काल मुलाखतीच्या दरम्यान उमेदवारांचे व्यक्तिमत्त्व, शैक्षणिक पात्रता, विषयाचे ज्ञान, सामान्यज्ञान, चालू घडामोडी, नाट्य, कला, एनसीसी, वाक्‌चातुर्य, कर्तृत्व शक्ती, बलस्थाने व कमकुवतपणा, व्यावसायिक अनुभव, क्षमता, कल्पकता, सृजनशीलता, कौशल्य, वक्तृत्व, सभाधीटपणा, उत्तम देहबोली, आत्मविश्‍वास तसेच आज्ञाधारकपणा इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींचा विचार मुलाखतीदरम्यान केला जातो, हे उमेदवारांनी चांगले लक्षात घ्यावे. यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व सॉफ्ट स्कील तंत्राचा उपयोग होतो.
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी?

मुलाखतीच्या पूर्वी आपला बायोडाटा किंवा Resume व्यवस्थित तयार करावा. यामध्ये स्वतःची सर्व व सत्य माहिती समाविष्ट करावी. उदा., पूर्ण नाव व पत्ता, जन्मतारीख, शैक्षणिक व तांत्रिक पात्रता, अनुभव, छंद, भाषा ज्ञान, इतर प्रावीण्य (Extra Curriculer - Activities), संदर्भ मोबाईल नं, टेलिफोन नं, ई-मेल, वेबसाइट वगैरे माहिती लिहावी. याप्रमाणेच आपली ओरिजनल सर्टिफिकेटस्‌ची फाइल व्यवस्थितपणे तयार करावी. सर्टिफिकेटच्या ऍटेस्टेड कॉपीज व फोटोग्राफ तयार ठेवावेत.
मुलाखतीला जातानाची पूर्वतयारी कशी करावी?

मुलाखतीला जाताना स्वच्छ, व्यवस्थित व योग्य कपडे परिधान करावेत. 
रंगीबेरंगी, भडक, फॅशनेबल कपडे वापरू नयेत. मुलाखतीच्या ठिकाणी वेळेवर किंवा अर्धा तास अगोदरच पोचले पाहिजे व संबंधित कार्यालयात आपल्या उपस्थितीचा रिपोर्ट करावा. कॉल लेटर व फाइल बरोबर न्यावी. मुलाखतीसाठी बोलाविल्यावर सर्व प्रकारचे शिष्टाचार (good manners) पाळले पाहिजे. मुलाखतीदरम्यान (In Actual Interview) कसे वागावे - बोलावे.

1) मुलाखतीच्या रूममध्ये प्रवेश करताना दरवाजावर टक -टक करूनच प्रवेश करावा. घाई-गडबड करू नये. आत्मविश्‍वासाने व मोकळ्या मनाने आत जा.
2) बसताना उमेदवाराने सरळ व ताठ बसावे. हात टेबलावर न ठेवता मोकळे ठेवावेत.
3) मुलाखतीमध्ये आपली देहबोली (Body Language) फारच महत्त्वाची असते.
4) मुलाखती दरम्यान आपली उत्तरे अचूक व मोजक्‍या शब्दात व्यक्त करावीत. बोलताना स्पष्ट बोलावे म्हणजे शब्दोच्चारण कळाले पाहिजे.
5) स्वतःचा परिचय करून देताना मुद्देसूदपणे स्वतःची प्रभावी ओळख करून द्या. आत्मविश्‍वासपूर्वक तर्कशुद्ध बोलावे.
6) काही वेळा मुलाखतकार किंवा परीक्षक तुम्हाला राग येईल असे प्रश्‍न विचारतात किंवा अर्थ नसलेले व संबंध नसलेले प्रश्‍न विचारतात किंवा काही वेळा मोठ्याने बोलून तुमच्या उत्तरांवर टीका करतात, अशा वेळी शांतपणे व संयमाने उत्तर द्या. रागावू नका. उदास न होता समर्पक उत्तर द्यावे.
7) मुलाखत देताना समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर लावून (Keep eye contact) उत्तरे द्यावीत. खाली मान करून किंवा नजर खाली करून उत्तरे देऊ नयेत.
8) मुलाखतीमध्ये अनावश्‍यक वादविवाद टाळावा.
9) एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर येत नसेल तर सौजन्याने नाही म्हणा परंतु खोटी उत्तर देण्याचे टाळावे.
10) तुमच्या घरच्या नाजूक आर्थिक परिस्थितीचे प्रदर्शन करू नका किंवा व्यक्तिगत अडचणी-प्रश्‍न सांगून परीक्षकाची सहानुभूती मिळवू नका.

अशा रीतीने मुलाखतीची तयारी करताना वरील गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवाव्यात. आपली मुलाखत (Interview) नेमणुकीपूर्वीचा महत्त्वाचा टप्पा आहे. तेव्हा उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी विविध गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. उदा., आपण स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ बडोदा, युनियन बॅंक ऑफ इंडिया, कॅनरा बॅंकेच्या इंटरव्ह्यूला जाणार असल्यास सर्वप्रथम त्या-त्या बॅंकेची किंवा संस्थेची माहिती इंटरनेटवरून डाऊनलोड करून घ्यावी व त्याचा अभ्यास करावा. 

याबरोबरच बॅंकांचे राष्ट्रीयीकरण, रिझर्व बॅंकेचे आर्थिक धोरण, बॅंकांची विविध कार्ये, सीबीएस सिस्टिम, कॉम्प्युटरविषयक व मार्केटिंगविषयक प्रश्‍न, ज्यामध्ये शिक्षण घेतले आहे त्याविषयी प्रश्‍न, चालू घडामोडी, अर्थशास्त्र, बॅंकिंग फायनान्स, बजेटविषयक प्रश्‍न, छंद, आवडी-निवडी, आपल्या परिवाराविषयी (Family Background) प्रश्‍न, आपला परिचय करून देण्यासही सांगू शकतात. 

आमच्या बॅंकेविषयी काय माहिती आहे, असेही विचारतात. तुमची बलस्थाने कोणती (strengths), तुमचा कमकुवतपणा कशात आहे, असेही प्रश्‍न विचारतात. याप्रमाणेच बॅंक रेट, रेपो रेट,रिव्हर्स रेपो रेट, डिपॉझिट ऍडव्हान्सेस, मर्चंट बॅंकिंग, आयपीओ, जीडीपी, मनी लॉन्डरिंग, एनएपी, द्विपक्षीय करार, रिझर्व बॅंकेची आर्थिक नीती, बॅंक खात्यांचे प्रकार, आयटी मार्केटिंग वगैरे प्रश्‍नांची मालिकाच देता येईल.

अशा रीतीने मुलाखत ही कोणत्याही नोकरीच्या नियुक्तीमध्ये महत्त्वाची ठरते. मुलाखत ही सहज व सोपी गोष्ट नाही. चांगली पूर्वतयारी केल्यास हमखास नोकरीची संधी मिळू शकेल, यात शंकाच नाही.

No comments:

Post a Comment